Friday, July 21, 2006

काहितरी वेगळ करायचय........
ढगातुन थेंबाच्या सोबत बरसायचय
पाणवठा जरी गढुळ असला तरी
पुन्हा पाणवठयात येवून नहायचय.

काहितरी वेगळ करायचय........
आसमंतात वा-यासारख झाडांना झोंबायचाय
पानांच्या जाळीवर बसुन उडायचय
मिटलेल्या श्वासांना आता अस्तित्वातात आणायचय.

काहितरी वेगळ करायचय........
स्वप्नांच्या देशात भटकायचय
प्रयोगानिशी शोधायचय
भवनेच्या पंखात बळ घेऊन
पुन्हा मायदेशी परतायचय.

काहितरी वेगळ करायचय........
चिखलातल्या कमळाला फुलवायचय
सुकलेल्या फुलांना जगवायचय
माती रुक्ष असलि तरी
मातीतल्या माणसांसाठी जगायचय.

काहितरी वेगळ करायचय........
एक स्वप्न उराशी बाळगायचय
काहि वेगळ करता नाहि आलं तरि
माणसातल्या माणूसकीला मात्र जपायचय

Monday, July 17, 2006

कविता (न कळलेली)

ती माझ्याशी बोलायची,
रोज गोड हसायची,
कधी कधी माझी वाट बघत थांबायची....

दुसरी एकही मुलगी
माझ्याशी कधी बोलायची नाही,
ही पोरगी मात्र
माझी पाठ कधी सोडायची नाही....

तिच्या आयुष्यातल्या गमती
ती रोज मला सांगायची,
मी नवी लिहिलेली कविता
सारखी वाचायला मागायची....

एकदा मला म्हणाली
"तू माझ्यावर कध्धीच कविता करत नाही !"
तेव्हा मला समजलं....
तिला माझी एकही कविता कळत नाही !
आठवून पाहायचो मी काही पावसाळे
तिच्या-माझ्या संगतीत भिजलेले
हवे भोवती गंध घेवून
रानोमाळ पसरलेले. . .

आठवायचा अवचीत मग तो नदीकाठ
कमळ फुलांनी बहरलेला
चांदणीची वाट पाहत मग
तो चंद्र रात्र जागलेला. . .

जाणवायची नकळत मग ती बोचरी थंडी
गुलाबी स्वप्नातून जागवणारी
नुसतीच मग एक निरर्थक धडपड
अपूर्णततेही पूर्णत्व शोधणारी. . .

आठवून यायची, तीची सारी वचने
अशीच कुठेशी मोडून पडलेली
प्रतिसादांना शोधणारी तीची प्रत्येक हाक
नियतीने माझ्यापासून दूर लोटलेली. . .

दाटलेलं धुकं मग सावकाश पाझरायचं
ओल्या होवून जायच्या तिच्या सगळया "आठवणी"
एखाद-दुसरां मग त्या चुकार थेंबानी
उगीचचं भरुन यायची माझी गोठलेली "पापणी" ..........
कुणीतरी आठवण काढतंय

हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव... आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही"
तुझ्या घरावर...

तुझ्या घरावर कोसळणारा पाऊस माझ्याशी असं का वागतो ?
नुसतं बरसून जाण्यासाठी सुद्धा आसवांची व्हिजिटिंग फ़ी मागतो...

तुझ्या दाराशी रेंगाळणारा वारा माझ्याशी असं का वागतो ?
तुझ्या केसातला मोगराच त्याला नेहमी का लागतो ?

तुझ्या अंगणातला चंद्र माझ्याशी असं का वागतो ?
चांदण्याने जग न्हाताना माझ्या अंगणात काळोख दाटतो...

तुझ्या ओसरीवरचा कंदील तेवढा माझ्याशी ईमान राखतो...
रात संपेपर्यंत मी आणि वात संपेपर्यंत तो जागतो ...
आई आई एक नाव असतं. घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं!
सर्वांत असते तेव्हाजाणवत नाही. आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही!
जत्रा पांगते पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात.
आई मनामनात तशीच जाते ठेवून काही, जिवाचं जिवालाच कळावं असं जाते देऊन काही.
आई असतो एक धागा, वातीला उजेड दावणारी समईतली जागा.
घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान, विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान
पिकं येतात जातात माती मात्र व्याकुळच तिची कधीच भागत नाही तहान दिसत नसलं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल खोल की सापडतेच अंतःकरणातली खाणयाहून का निराळी असते आई?
ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गायी?
आई खरंच काय असते?
लेकराची माय असते वासराची गाय असते दुधाची साय असते लंगड्याचा पाय असते धरणीची ठाय असते आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही!
आई एक नाव असतं नसते तेव्हा घरातल्या घरात गलबललेलं गाव असतं!!
एक तरी......एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !

एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !

एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !

एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..

एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..

एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..

एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात...